खंडोबाची टेकडी म्हणजे नाशिककरांसह बाहेरगावच्या अनेक भाविक व पर्यटकांच्या अगदी परिचयाचं ठिकाण . शहरापासून साधारण १५ किलोमीटर अंतरावरील देवळाली कॅम्प परिसरातलं हे ठिकाण आहे . बहुतांश भाग हा लष्कराच्या ताब्यात असल्याने मंदिराकडे जातानाच त्याचा अंदाज येतोच . टेकडीच्या पायथ्याशीच जवान उभे असतात . डाव्याबाजूला तोफ ठेवलेली आहे . समोर पायर्यांजवळ टेकडीसंदर्भातील माहिती लिहिलेली आहे . त्यानुसार या टेकडीचा उल्लेख विश्रामगड म्हणून आढळतोच . शिवाय शिवाजीमहाराजांचं वास्तव्य असल्याचंही त्यात म्हटल आहे . प्रत्यक्षात हा उल्लेख चुकीचा असल्याचे अभ्यासक सांगतात . कारण विश्रामगड म्हणजे इथून जवळच असलेला पट्टा किल्ला . तिथे महाराजांचे वास्तव्य होते . रुंद व बसक्या पायऱ्या असल्याने टेकडी चढताना फारशी तकलिफ होत नाही . म्हणूनच सहकुटूंब दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्याही बरीच असते . टेकडीचं सुशोभिकरण झालेलं असल्यामुळे ' धार्मिक पर्यटनही ' येथे घडते .
मंदिराच्या आवारात समोरच मोठी घंटा दिसते. खंडोबाची भव्य मूर्ती , बाजूलाच शिवलिंग , नंदी आणि मणी - मल्ल या राक्षसमूर्ती आहे . येळकोट जय मल्हार अशा जयघोषात हा परिसर गजबजलेला असतो . इथले वैशिष्ट्य म्हणजे हा परिसर लष्कराच्या ताब्यात असल्याने तिथली शिस्त , शांतता व स्वच्छतेमुळे हे वैभव टिकून आहे . खंडोबा मुळात कर्नाटकमधील देवता आहे . कानडी भाषेत येळू अर्थात सात व कोट म्हणजे कोटी म्हटले जाते . खंडोबाचे सात कोटी सैन्य होते . सात कोटींच्या पटीत घरात धनधान्य असावे , हा त्यामागील हेतू होता . त्यामुळे ' तळी आरती ' च्या वेळी ' येळकोट येळकोट जय मल्हार ' असा जयघोष केला जातो .
खंडोबा टेकडीवर मंदिरापासून पुढे ध्वज आहे . मंदिराच्या पाठीमागे उद्यान ,झाडे ,निवांत बसण्यासाठी जागा अहे. टेकडीपासून काही अंतरावर लष्कराच्या छावण्या दिसतात . स्वच्छ व शिस्तबद्ध परिसरामुळे या ठिकाणी सहकुटूंब येणाऱ्या भाविकांसोबतच तरुणाईचीही येथे वर्दळ असते . दोन डोंगरांच्या व्ही आकारात सूर्यास्त होतानाचे दृष्य वर्षातून पाहता येतं . हा नजारा टिपण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून येत असतात .
मणी - मल्ल या राक्षसांनी शंकराकडे पृथ्वी व पाताळावर राज्य असू देण्याचा वर मागितला आणि शंकराने तथास्तू म्हटलं . मात्र मणी - मल्लचा सर्वांना त्रास होऊ लागला . तेव्हा या राक्षसांपासून भक्तांचे संरक्षण करण्यासाठी शंकराने खंडोबाचा अवतार घेऊन त्यांचा विनाश केला . ते दोघंही शिवभक्त होते . मात्र त्यांना शंकराचाच विसर पडला होता , असा संदर्भ आढळतो . त्या अवतारात शंकराने या ठिकाणी विश्रांती घेतली होती . त्यांचे स्मरण म्हणून पाचशे वर्षांपूर्वी या ठिकाणी मंदिराची उभारणी केल्याचं सांगितलं जातं . मणी - मल्ल शंकराला शरण आल्यामुळे , खंडोबासह दोन्ही राक्षस व शंकरालाही इथे. स्थान दिलं गेले आहे . . मंदिराच्या गाभाऱ्यात खंडोबाची सुमारे आठ फुटी खांडधारी मूर्ती व दोन्ही बाजूला बाणाई व म्हाळसाई यांच्याही मूर्त्या आहेत.
दरवर्षी भगूरमधून पालखीही काढली जाते . अन्य गावांप्रमाणेच बारागाड्या ओढण्याची पद्धत आहे . चंपाषष्ठीला या ठिकाणी मोठी यात्रा भरते . त्या दिवशी लंगरी जागरण करून त्याच्या दुसऱ्या दिवशी पहाटे खंडेराव महाराज व म्हाळसाई यांचं लग्न लावलं जातं .
No comments:
Post a Comment