Monday, 24 March 2014

भंडारदरा

भंडारदरा धरण

निवसासाठी पाटबंधारे खात्याची २ निवासस्थानेही आहे. येथे एमटीडीसी चे गेस्ट हाउस आहे. धरणाची ऊंची २७० मीटर तर लांबी १६६० मीटर आहे. ११ टीएमसी म्हणजे ११००० दशलक्ष  घनफुट पाणी साठवण क्षमता आहे. प्रवरेतिल चिंचोळ्या खिंडी, कळसूबाई व बालेश्वर या दोन टेकड्यांत हे धारण बांधलेले आहे. या धरणाचे बांधकाम १६१० मध्ये सुरु झाले व १९२६ मध्ये पूर्ण झाले. या धरणाची मूळ लांबी २१० फुट तर उंची २८२ फुट आहे.


२५० फुटांवरून जे पाणी वेगात सोडले जाते ते खाली एका कड्यावर पडून वर उसळते व पाण्याला चात्रीसारखा आकार येतो. हाच अम्ब्रेला फॉल म्हणून ओळखला जातो. अम्ब्रेला फॉलसमोर छान उद्यान साकारले आहे. वीजनिर्मितीही केली जाते. (पुरण कथेनुसार अगस्ती मुनींनी या क्षेत्री वर्षभर तप केले तेव्हा त्यांना भगवान शंकर प्रसन्न झाले होते. त्यांनी आशीर्वाद म्हणून गंगेचा प्रवाह दिला. तो म्हणजे प्रवरा नदी. ) रंध धबधबा पाहण्यासारखा आहे. धबधब्याच्या वरच्या बाजूला छोटेसे घोरपडी देवीचे मंदिर आहे. रमणीय देखाव्यामुळे या धिकाणी चित्रपटांचे चीत्रीकरणेही मोठ्या प्रमाणात होतात. 



रतनवाडी

भंडारदऱ्याहुन बोटिंगचा आनंद घेत रतनवाडी येथे जाता आहे. रतनवाडी येथे अमृतेश्वराचे पुरातन हेमाडपंती मंदीर आहे. या मंदीरावरील दगडी नक्षीकाम अत्यंत सुबक आणि देखणे असुन त्यात मुख्य गाभाऱ्यात एक् शिवलिंग आहे. पावसाळ्यात हे शिवलिंग पुर्णत: पाण्यामध्ये बुडालेले असते. रतनवाडी परीसरात अनेक धबधबे असुन गळ्यातील हारासारखा दिसणारा 'नेकलेस फॉल' हा विशेष लोकप्रिय आहे.

घाटघर 

शेंडी येथुन पश्चिमेकडे २२किमीवर घाटघर हे निसर्गसौंदर्याने नटलेले एक गाव आहे. भंडारदरा धरणाच्या कडेकडेने घाटघरपर्यंत करावयाचा प्रवास अतिशय आनंददायी आहे. घाटघर गावचा कोकणकडा अतिशय प्रसिद्ध असुन इथुन कोकण आणि सह्याद्री पर्वताचे विलोभनीय दृश्य पहायला मिळते. इथे अनेक धबधबे असुन पावसाळ्यात हा संपुर्ण परिसर धुक्यात हरविलेला असतो. घाटघरला खुप पाऊस पडतो म्हणुन यास नगर जिल्ह्याचे चेरापुंजी असे म्हंटले जाते.

अमृतेश्वर मंदिर :  रातनववाडी येथे हे मंदिर आहे. जवळपास ७-८ किलोमीटर अंतर  करण्याची सोय आहे. या मंदिराचे बांधकाम ११ व्या शतकातील आहे. हेमाडपंथी, उत्तम शिल्पकला व कोरव काम पाहताक्षणी मन वेधून घेते.


 अनेक वेगवेगळ्या मंदिरांनी हा  प्रदेश नटलेला आहे.  पर्यटनाबरोबरच मनशांती साठी अनेक पर्यटक या ठिकाणी भेट देतात. इतर सर्व पर्यटक स्थळापेक्षा हे पर्यटन या सर्वामुळे वेगळे ठरते. म्हणून दरवर्षी हजारो पर्यत या भांडारदर्याला भेट देतात. 


Tuesday, 18 March 2014

फिरुया खंडेराव टेकडी


    नाशिक  शहरापासून   काहीसं   दूर   असलेलं   खंडोबाची   टेकडी   देवस्थान  हे  प्रसन्न   आणि   निसर्गरम्य   वातावरणामुळे  भाविकांसह   पर्यटकांसाठीही  महत्त्वाचे  ठिकाण म्हणून ओळखले जाऊ लागले आहे .  
         खंडोबाची   टेकडी   म्हणजे   नाशिककरांसह   बाहेरगावच्या   अनेक   भाविक   व   पर्यटकांच्या   अगदी   परिचयाचं   ठिकाण  . शहरापासून   साधारण   १५   किलोमीटर   अंतरावरील   देवळाली   कॅम्प   परिसरातलं   हे   ठिकाण आहे . बहुतांश   भाग   हा   लष्कराच्या   ताब्यात   असल्याने    मंदिराकडे   जातानाच   त्याचा   अंदाज   येतोच . टेकडीच्या   पायथ्याशीच   जवान   उभे   असतात  . डाव्याबाजूला   तोफ   ठेवलेली   आहे  . समोर  पायर्यांजवळ    टेकडीसंदर्भातील   माहिती   लिहिलेली   आहे  . त्यानुसार   या   टेकडीचा   उल्लेख   विश्रामगड   म्हणून   आढळतोच  . शिवाय   शिवाजीमहाराजांचं   वास्तव्य   असल्याचंही   त्यात   म्हटल आहे . प्रत्यक्षात   हा   उल्लेख   चुकीचा   असल्याचे  अभ्यासक   सांगतात  . कारण   विश्रामगड   म्हणजे   इथून   जवळच   असलेला   पट्टा   किल्ला  . तिथे    महाराजांचे   वास्तव्य   होते   . रुंद   व   बसक्या   पायऱ्या    असल्याने   टेकडी   चढताना   फारशी   तकलिफ   होत   नाही  . म्हणूनच   सहकुटूंब   दर्शनासाठी   येणाऱ्या   भाविकांची   संख्याही   बरीच   असते  . टेकडीचं   सुशोभिकरण   झालेलं   असल्यामुळे  ' धार्मिक   पर्यटनही ' येथे घडते  . 


               मंदिराच्या   आवारात   समोरच   मोठी   घंटा   दिसते.   खंडोबाची   भव्य   मूर्ती  , बाजूलाच   शिवलिंग  , नंदी   आणि   मणी  - मल्ल   या   राक्षसमूर्ती आहे . येळकोट   जय   मल्हार अशा   जयघोषात   हा   परिसर   गजबजलेला    असतो  . इथले   वैशिष्ट्य   म्हणजे   हा   परिसर   लष्कराच्या   ताब्यात   असल्याने    तिथली   शिस्त  , शांतता   व   स्वच्छतेमुळे हे  वैभव   टिकून   आहे  . खंडोबा   मुळात   कर्नाटकमधील   देवता आहे . कानडी   भाषेत   येळू   अर्थात   सात   व   कोट   म्हणजे   कोटी   म्हटले   जाते . खंडोबाचे    सात   कोटी   सैन्य   होते . सात   कोटींच्या   पटीत   घरात   धनधान्य   असावे  , हा   त्यामागील   हेतू होता  . त्यामुळे  ' तळी   आरती  ' च्या   वेळी  ' येळकोट   येळकोट   जय   मल्हार  ' असा   जयघोष   केला   जातो  .  



            खंडोबा टेकडीवर मंदिरापासून पुढे ध्वज आहे . मंदिराच्या पाठीमागे उद्यान ,झाडे ,निवांत बसण्यासाठी जागा अहे. टेकडीपासून काही अंतरावर लष्कराच्या छावण्या दिसतात . स्वच्छ   व   शिस्तबद्ध   परिसरामुळे   या   ठिकाणी   सहकुटूंब   येणाऱ्या   भाविकांसोबतच   तरुणाईचीही  येथे  वर्दळ असते  . दोन   डोंगरांच्या   व्ही   आकारात   सूर्यास्त   होतानाचे  दृष्य  वर्षातून   पाहता   येतं  . हा   नजारा   टिपण्यासाठी   अनेक   पर्यटक   आवर्जून   येत   असतात  . 

             मणी  - मल्ल   या   राक्षसांनी   शंकराकडे   पृथ्वी   व   पाताळावर   राज्य   असू   देण्याचा   वर   मागितला   आणि   शंकराने   तथास्तू   म्हटलं  . मात्र   मणी  - मल्लचा   सर्वांना   त्रास   होऊ   लागला  . तेव्हा   या   राक्षसांपासून   भक्तांचे संरक्षण   करण्यासाठी   शंकराने खंडोबाचा   अवतार   घेऊन   त्यांचा   विनाश   केला  . ते   दोघंही   शिवभक्त   होते  . मात्र   त्यांना   शंकराचाच   विसर   पडला   होता  , असा   संदर्भ   आढळतो  . त्या   अवतारात   शंकराने   या   ठिकाणी   विश्रांती   घेतली   होती  . त्यांचे  स्मरण   म्हणून पाचशे   वर्षांपूर्वी   या   ठिकाणी   मंदिराची   उभारणी   केल्याचं   सांगितलं   जातं  . मणी  - मल्ल   शंकराला   शरण   आल्यामुळे  , खंडोबासह   दोन्ही   राक्षस   व   शंकरालाही   इथे. स्थान   दिलं   गेले आहे .   . मंदिराच्या   गाभाऱ्यात   खंडोबाची   सुमारे   आठ   फुटी   खांडधारी   मूर्ती   व   दोन्ही   बाजूला   बाणाई   व   म्हाळसाई   यांच्याही   मूर्त्या   आहेत. 


            दरवर्षी   भगूरमधून   पालखीही   काढली   जाते  . अन्य   गावांप्रमाणेच   बारागाड्या   ओढण्याची   पद्धत   आहे  . चंपाषष्ठीला   या   ठिकाणी   मोठी   यात्रा   भरते  . त्या   दिवशी   लंगरी   जागरण   करून   त्याच्या   दुसऱ्या   दिवशी   पहाटे   खंडेराव   महाराज   व   म्हाळसाई   यांचं   लग्न   लावलं   जातं  . 

Thursday, 6 March 2014

" एैश्वर्यसंपन्न " " क़िल्ला गाळणा"

" आजमितीस महाराष्ट्रात जे म्हणुन गड-किल्ले "तट-बुरुज व इतर एैतिहासिक अवशेषांनी संपन्न आहेत ..अनं जे आजही सर्वाेत्तम स्थितीत तग धरुन आहेत ,त्यात "क़िल्ला गाळणा" मानाचं स्थान टिकवुन आहे..त्यातल्या त्यात नाशिक जिल्हा व परिसरातला ताे प्रथम क्रमांकाचा अवशेष संपन्न असा किल्ला आहे "
" क़िल्ला म्हटला कि आपल्या डाेळ्यांसमाेर आपसुक तटबंदी ,बुरुज,कातळ-दरवाजे,राजवाडा,काेरिव शिल्प्े,चाेर-दरवाजे,कातळ-काेरिव पाण्याचे टाके,टेहळणी चाैक्या,गुहा,मंदिर,इ.अवशेषांची मांदियाळी उभी राहते.आश्चर्य म्हणजे हे सर्व अवशेष गाळणा" वर बघायला व अनुंभवायला मिळतात..
" नाशिक जिल्ह्याच्या पुर्व भागात सह्याद्रिच्या पुसटश्या रांगा तुटकश्या हाेत जातात..ज्या आहेत त्या विखुरलेल्या ,अनं टप्या-टप्यांवर तुरळक गड-किल्लांचे सांज चढवून आहेत..त्यात गाळणाची हि अवशेष संपन्नता खराेखरीचं अचंबित करणारी आहे..
अशा या एैश्वर्यसंपन्न किल्यावर जाण्यासाठी नाशिकहून प्रथम मालेगांव हे शहरी ढंगाचं गांव गाठावे..तिथल्या नविन बस-स्थानकाजवळुनचं उत्तरेला डाेंगराळे,गाळणा गावांकडे जाणारा रस्ता आहे.३० किमी वरचं हे गाळणा गांव मात्र अगदि ग्रामीण ढंगाचं.गांवाच्या वेशीवर येताचं प्रथम ,डावीकडे दुरवर ठळक तटबंदि व इतर अवशेषांच्या उठावामुळे क़िल्ला आपलं लक्ष वेधताे.. किल्याच्या उत्तर पायथ्याशीचं "गाेरक्षनाथ शिवपंचायतन मंदिर" फारचं सुंदर व एैसपैस आहे..तिथुन पुढ्यातचं किल्ल्याकडे जाण्यासाठी वाट आहे..प्रथमचं पुर्वाभिमुख "परकाेट दरवाज़ा "आपलं स्वागत करताे..दाेनही बाजुंना देवड्या अनं काेरिवकाम फारचं सुरेख आहे..पुढे थाेड्याचं चढाईनंतरचा "लाेखंडी दरवाज़ा "मात्र फारचं भरभक्कम व सुस्थितीत आहे,त्यावर पर्शियन भाषेतला शिलालेख ,एैसपैस देवड्या,अनं लक्षवेधी चाैकिदारासाठीचा काेट व बांधणी लाजवाब आहे.तिसरा दरवाज़ा व लगतचा काेट तर काय अफ़लातून आहे.चाैथा " लाखा दरवाज़ा" ही नक्षीदार पण ढासळत्या अवस्थतेतला..उजव्या बाजुला तटबंदीवर दाेन सुरेख नक्षीदार सज्जे ,घुमटी लक्ष वेधतात.सज्जातुनच किल्याची भव्यता लक्षात येते..पाठीमागे पाच गुहा आहेत.एकात मंदिर ,दुस-यात पाणी,इतर काेरड्या ठाक..पुढे उजवीकडे गुप्त दरवाज़ा आहे ,ताे थेट ख़ाली पहिल्या दरवाज्या पर्यंत नेताे..परतीला येंऊन माथ्याकडे निघायचं ..तटावरची काेरिव नक्षीदार उध्वस्त कमान सा-या किल्याचाचं मानबिंदू वाटते इतकि ती अनाेखी आहे..माथ्यावर येताचं समाेर मशिद दिसते.१५ व्या शतकात येथील गाळणेश्वराचं मंदिर उध्वस्त करुन मशिद बांधल्याची नाेंद इतिहासात आहे..पुढ्यात भल्ला-माेठा हाैद सुस्थितीत आढळताे..काहि अंतरावर भग्न अंबरखाना व सदर शेवटची घटका माेजत आहेत.किल्याच्या मध्यभागी बालेकिल्यासारखी टेकडी असुन त्यावर ब-यापैकि झाड दिसतात.पुर्व भागात सुस्थितीतली तटबंदी व एका इंग्रज अधिका-याचे थडगे दृष्टिस पड़ते.किल्याची चाैफेर फेरी पुर्ण करतांना अनेक उध्वस्त बांधकामाच्या खुणा ,इतिहासकाळातील या किल्याची ऐश्वर्यसंपन्नता लक्षात आणतात..
"बांधकाम शैलीचा इतका अप्रतिम क़िल्ला बघुन मनं मात्र इतिहास काळात रमत अनं इतक्या उशिरा असेना इतका सुंदर किल्ला बघण्याचे भाग्य आपल्याला लाभले याचा अत्यानंद हाेताे..
____________________________________________________________________________
" क़िल्ला गाळणा "
तालुक़ा : मालेगांव
रांग:: गाळणा रांग
पायथ्याचं गांव:: गाळणा
अंतर :: नाशिकपासुन १३० किमी.
चढाई श्रेणी:: साेपी
विस्तार :: माेठा
पाणी : मुबलक
बेस्ट: सप्टेंबर ते मार्च
वेळ : गडफेरीला ५ तास..
"विद्यार्थी व तरुणांनी आवर्जुन बघावा असा हा क़िल्ला आहे..चित्रकारांसाठी तर एकाहून एक सरस फिचर्स आहेत.."
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

"खान्देशचा पाठिराखा" " लळिंग "

                      चला ट्रेकिंगला "
                                     -------------------
                               

                                


     खान्देशातल्या रणरणत्या उन्हाची लाई-लाई हाेण्याच्या अगाेदरचं तुरळकतेने अस्तव्यस्त विखुरलेले या भागातले गड-किल्ले भटकुन घेण्याचा "एक कलमी कार्यक्रम "आताच आखायला हवा..त्यासाठीचा शुभारंभ करुया "किल्ले लळिंग "पासुन..
शिवशाहिच्या ददैप्यमान कालखंडात खान्देशातल्या या व इतर गडकिल्यांचा वाटा तसा जुजबीच..वर्षानुवर्षे परकियांच्या राजसत्तांची गुलामगिरी अनं वतनदारांच्या माेहात अडकलेले मराठे सरदार संस्थानिक ..हे शल्य आजही महाराष्ट्र च्या एैतिहासिक पानांवर काळी किनार लेवुन खदखदतय..
        " मुळातचं पश्चिमेकडुन खान्देशचं प्रवेशद्वार म्हणजे "क़िल्ला लळिंग "असं नमुद करणं वावगे ठरणार नाहि .बागलाण व खान्देशच्या अगदि सिमेवर क़िल्ला लळिंगचं आटाेपशीर अस्तित्व मात्र त्याच्या संपन्न अवशेषांमुळे भारावुन टाकते..इसवीसन १३९९ मध्ये फारुखी राजघराण्याचा राजा मलिक याचा मृत्यु झाला अनं त्याचा मुलगा नसीरखानकडे लळिंग व सभाेवतालचा प्रदेश ताब्यात आला..त्यानेचं या किल्याला राजधानीचा शिरपेच चढवला अनं लळिंगला साेन्याचे दिवस अनुभवण्याचं भाग्य लाभलं..(२० व्या शतकातही १९३० मध्ये महात्मा गांधींनी सुरु केलेली सविनय कायदाभंगाच्यी चळवळीत भिल्ल व आदिवासी युवकांनी जंगल क़ायदा माेडुन पाठिंबा दर्शविण्यासाठी लळिंगच्या पायथ्याशी आंदाेलन उभारले..)

     लळिंग किल्यावर जाण्यासाठी नाशिकहून थेट मालेगांव मग धुळ्याकडे कुच करावी..धुळे शहर येण्याअगाेदरचं हायवेच्या काठावरचं ९ व्या किमीवर डावीकडे जाे डाेंगर दिसताे ताेचं " क़िल्ला लळिंग "..किल्यावरील चाेफेरची तटबंदी अनं ठळक सज्ज्यांच्या कमानीमुळे ताे सहज लक्षात येताे..पुर्व बाजुने वनखात्याचं प्रवेशद्वार आेलांडुन किल्यावर चढाई करता येते. तसा राजमार्ग पुर्वेकडुनचं आहे.पायथ्याच्या प्राचीन अशा लळिंग गावांतन..पण चढाईसाठी दाेनही बाजुंनी वेळ सारखाचं लागताे..
       " आपण निघु या पश्चिमेकडुन.अर्ध्या तासात कातळपाय-यावर कसरत करत प्रवेशद्वारापाशी येताे..त्याची भरभक्कम तटबंदी व बांधकामशैली बघुन अचंबित व्हायला हाेतं.प्रवेशद्वारावरचं शरभाचं शिल्प तर फारचं सुरेख..ते न्याहळतचं आपण किल्यात प्रवेश करताे..किल्याच्या आतल्या तटावरुनं गडफेरीसाठी दाेनही बाजुंनी वाटा फुटतात..दुरवरुनचं दिसणा-या लंक्षवेधी कमानी तर समाेरचं उभ्या ठाकलेल्या.शेवटची घटका माेजत असलेली काेरीव शिल्पे,नक्षीदार काम ,शत्रुचा वेध घेण्याच्या चर्या,घुमटवजा मनाेरा,एकुणच "कलात्मकता "मुस्लिम स्थापत्य शैलीचा अप्रतिम नमूना पेश करतात..वाटेवर एक बुलंद बुरुज त्यावर ताेफेसाठी गाेल कट्टा अजुनही सुस्थितीत आहे.मध्य भागातल्या उठाव आलेल्या टेकडी लगतचं चुन्यात बांधलेले तेला-तुपाचे रांजण ,दारुगाेळा-धान्याचे काेठार,पाण्याचे हाैद,यांची बांधकाम दृष्टीस पडतात.यासाठी चुना व विटांचा वापर लक्षात येताे..तट व त्यावरील पाकळ्यांच्या आकारांची ताेरण फारुखी राजसत्तेची याद आणतात..वाड्यांची जाेती,घरांचे अवशेष,धान्यकाेठाराची उध्वस्त इमारत,दुर्गा मातेचं टुमदार मंदिर,पाण्याचे हाैद अशी सर्व एैतिहासिक स्थावर संपत्तीबघुन माेहरायला हाेत.अनं इतिहासकाळात या भागातील गाळणा किल्यानंतर लळिंगचं अनन्यसाधारण महत्व असेल हेही लक्षात येतं..

---------------------------
     "लळिंगचा ट्रेक आटाेपल्यानंतर ,वेळ असल्यास धुळ्यापुढिल किल्ला साेनगिरचा किंवा मालेगांव जवळचे गाळणा वा कंक्राळा असे ट्रेक्स करता येतील.तसेच मालेगांव नंतरच झाेडगे गावांतील अप्रतिम असं हेमाडपंथीय धाटणीतं मंदिर आवर्जुन बघावे.."

---------------------------------------------------------------------------------------------------
किल्ला लळिंग "

पायथ्याचं गांव::लळिंग
रांग :: गाळणा रांग
उंची ::१९५३ फुट
नाशिकपासुन अंतर ::१४६ किमी
चढाई श्रेणी :: साेपी व आटाेपशीर.
विस्तार ::मध्यम
भटकंतीसाठी एकुण वेळ: ३ तासचला ट्रेकिंगला "
-----------------
"खान्देशचा पाठिराखा"

  "  लळिंग   "

' कलाडगड ' " सह्याद्रितला अनवट साथिदार

                                   " चला ट्रेकिंगला "
           
..............................................
" कलाडगड "
::::::::::::::::::
" वसंत ऋतुत असते
फळांची दिवाळी,अनं
पुष्पवृक्षांचा रंगाेत्सव........!
       वर्षाऋतुत दिसतात
        हिरवाईचे मखमली डाेंगर , अनं
रानफुलांची नक्षी लेवुन
सजलेल्या रानवाटा,,,,,,,
       हेमंतऋतुत मात्र संगत
       असते गाेड गुलाबी थंडीची ,
अनं बहारदार हवामानाची.."
~~~~~~~~~~~~~~~~~
"मग चला भटकायला या आल्हाददायक वातावरणात...
" आज बाळेश्वर रांगेतला दुर्लक्षित कलाडगडाकडे निघु या. खरं तर महाराष्ट्रातली तमाम भटकि जमात हरिश्चंद्र गड़ावर ट्रेकसाठी बारमाही येतच असते.ब-याचं भटक्यांच्या तर पंढरीच्या वा-या या गड़ावर सारख्या सुरुचं असतात.पण त्यांची पावलं काही कलाडकडे वळत नाहित ..म्हणुन त्याचं अस्तित्व दुर्लक्षित गटात.."
" ट्रेकिंगच्या छंदाची धडपड फळाला येऊ लागलीय,काळ्या-कभिन्न डाेंगरांना भिडण्याची खुमखुमी अंगाच्या अणुरेणुत मस्त मुरलीय..मग आता कुठे सिमारेषा आेलांडुन भटकंतीचा वारु असा चाैफेर उधळलाय कि आनंदाच्या सिमा पार झाल्यात.सह्याद्रिच्या अंगाखांद्यावर भटकतांना निसर्गाचे कितीतरी रुप अनुभवायला मिळाली .त्याअनुरुप तर एक संपन्न आनंदयात्रा आयुष्याची लकिर बनलीय..कलाडच्या कड्यावरुन नखशिकांत सह्याद्रिचं अपार रुप बघतांना या सर्वांची जाणीव मनाचा ठाव घेऊ पहातेय.कलाडगड आहेचं तसा राजबिंडा.
त्याचं हे राजबिंडेपण अनुभवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला प्रथम भंडारदरा मग पुढचं राजुर हे गांव गाठावं लागेल.तेथुन हरिश्चंद्र गडाच्या पायथ्याचं पाचनाई गांव..पाचनाईच्या पश्चिमेला जाे टुमदार डाेंगर दिसताे ताेचं "कलाडगड" ..गावातंनचं पश्चिमेला पेठेचीवाडी कडे जाणा-या रस्त्याने जात कलाडच्या उत्तरेच्या पायथ्याशी पाेहचायचं .तिथुनचं एक पायवाट दक्षिणबाजुने गडाच्या दिशेने जाते.
मग थेट खडी चढाईचं सुरु हाेते..काहि वेळानंतर माथ्यावर जाईं पर्यंत तीन ठिकाणी खड्या चढाईचे कातळ-टप्पे लागतात.अगदिचं अंगावर येणा-या चढाईला मात्र कातळ-काेरिव खाेबण्यामुळे दिलासा मिळताे तर ,काहि ठिकाणी पाय ठेवण्या एवढे कातळ टप्पे आहेत.पण चढाई खराेखरीचं धमालची आहे..हे थरारक दिव्य पार करुन आपण माथ्याच्या टप्यावर येताे.तिथचं गुहेत भैराेबाचं स्थान आहे,तर बाजुला देवीचं मंदिरही आहेचं.अनं शुध्द पाण्याचा झराही..प्रती-वर्षी अश्विन महिन्यात येथे जत्राही भरते.तेथुनचं उत्तरेला दुरवर शिरपुज्याचा भैरवगड,घनचक्कर,मुडा,कात्रबाई,आजाेबा हे महाकाय डाेंगर बघत छाती दडपुन जाते.सर्व सिनेमास्काेप नजराणा नजरेच्या पटलात बंदिस्त करत, दक्षिणेला निघायचं ते गडाच्या पुर्व बाजुने.पुढे मार्गात उजव्या बाजुला काही काेरडे टाके दिसतात. तर दक्षिण भागात एक जाभुळवृक्ष "अकेले हम"च्या स्थितप्रज्ञ अवस्थेत.पुढ्यात वेताळाचे ठाणे आहे.बाकि खुपअशी झाड नाहितच.माथ्यावरुन मात्र चारही बाजुंचा सह्याद्रिचा अफाट गाेतावळा अचंबित करताे.पुर्वेला हरिश्चंद्र गड त्या पलिकडे काेथळ्याचा भैरवगड,कुंझरगड,तर पश्चिमेला कुमशेतचा काेंबडा,नाफ्ता,दक्षिणेला दुरवर माळशेज घाट व परीसरातले गड-किल्ले/डाेंगरमाथे नजरेत सामावतात.चाैफेर भटकुन उत्तरेच्या माथ्यावर जायचं. पुन्हा सर्व भरदार विहंगम न्याहळत परतीला निघायचं.अन्य गड/किल्या सारखे इथं तट-बुरुज वा कुठलेही लक्षवेधी बांधकाम दृष्टीस पडत नाही.तरी कलाड भटकंती खराेखरीचं चिरस्मरणीय ठरते...!
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
" कलाडगड "
पायथ्याचं गांव :: पाचनाई
नाशिकहून अंतर : १३३ किमी.
रांग :: बाळेश्वर
उंची :::३६०८ फुट
नाशिकपासुन अंतर :::
चढाई श्रेणी ::: मध्यम

चला ट्रेकिंगला...अहिवंत

                             

                        " खुद शिवरायांचा प्रशस्तीपात्र"

                               "किल्ले अहिवंत "


                                                 
" साल २०१३ अखेरच्या टप्पात ..
नविन वर्षाच्या स्वागताच्या
तयारीत सर्वच गुरफटलेले ,
मस्त थंडीचं मायाजाल ,
ठेवणीतले गरम कपडे ,
रुबाबात बाहेर आलेले ,
सर्व-सामान्यांबराेबर बळीराजालाही ,
सुखावणारा हा काळ..
तसा ...तमाम निसर्ग वेड्यांना ..भटक्यानां ,
निसर्गवेड्यां छायचित्रकारांना,अनं ट्रेकर्स जातींला
वेड लावणारा असा सर्वांगसुंदर काळ...!
यावेळची भटकंती " किल्ले अहिवंतगडाकडे ......,
******************************************************
    " शिवरायांच्या (शिवशाहीच्या )अखेरच्या पर्वात म्हणजे सन १६८० मध्ये, त्यांनी सावत्र भाऊ
तंजावरचा व्यंकाेजी ,यास पाठवलेल्या पत्रात ते लिहीतात " राजश्री माेराेपंत त्या प्रांती पाठविले हाेते .
त्यांनी अहिवंत म्हणजे जैसा पन्हाळा ,त्याचे बराेबरी समतुल्य आहे, दुसरा नाहवागड,
बागलाणच्या दरम्यान आहे , ताे कठीण ताेही घेतला. हे दाेन किल्ले नामाेषित पुरातन जागे कबाज केले."
शिवशाहीत नाशिक परिसरात ज्या किल्यांना शिवस्पर्श झाला वा ते शिवरायांना भावले .
त्यातलाचं हा एक " अहिवंतगड ".लक्षवेधी अश्या सातमाळा रांगेतला ..
किल्ले अहिवंतकडे जाण्यासाठी नाशिकहून प्रथम वणी हे गांव गाठावे ..गांव आेलांडल्यानंतर चाैफुली लागते.उजवीकडेचा रस्ता जाताे नांदुरी/कळवण कडे तर डावीकडचा गुजरात/सापुतारा कडे.या दाेनही मार्गांनी
अहिवंतकडे जाता येते.सापुतारा रस्त्याने जात अचला-पिंपरी गांवाकडे जाणा-या फाट्याकडुन थेट बिलवाडीत पाेहचायचं किंवा अहिवंतवाडीत,येथुन अहिवंतवर चढाई करायची(जे ट्रेकर्स अचला क़िल्ला करुन अहिवंतकडे जाणार त्यांच्या साठी हा मार्ग साेईचा) किंवा वणी कडुन नांदुरीकडे जात लहानसा घाट संपण्याच्या आधीचं डावीकडे दरेगांवचा फाटा लागताे . हाकेच्या अंतरावरच्या गांवात गाड़ी लावुन ,गावाच्या पश्चिमबाजुने चढाई करायची..तश्या अजुनही ब-याचं उपवाटा चढाईसाठी उपलब्ध आहेत.आपण मात्र राजमार्गाने निघायचं ..
कुठल्याही बाजुने चढाई केली तरी ,तुमच्या स्वागताला कुठे महादरवाजा नाही (अगदी पडका सुध्दा नाही) ना कुठे तट-बुरुजाचे अवशेष..
         " दरेगांवाकडुन आपण पुर्वबाजुने किल्यावर येताे..पठार तस एैसपैस ,समाेर उजवीकडे बालेकिल्ला वजा टेकडी दिसते..त्या टेकडीला प्रदक्षिणा मारणे म्हणजेचं संपुर्ण किल्याची भटकंती केल्यासारखीच.पुढे उध्वस्त राजवाड्याचे अवशेष दिसतात, थाेडं उजवीकडे पाण्याचं टाकं (जान/फेब्रु पर्यंत पिण्यायाेग्य पाणी असत.) ,
आणि छाेट्याशा चाैथ-यावर हनुमंताची /भवानीमातेची मुर्ती आहे..अनं बाजुलाचं एक कुटी आहे ,त्यात म्हातारा साधु रहाताे.पुढे सरळ गेल्यास पश्चिमेकडे उतरुन डावीकडे एक गुहा लागते.मुक्कामासाठी झक्कास.दुरवर किल्ला अचला दिसताे.तसा बिलवाडी/अहिवंतवाडीचा परीसर दिसताे . परत माघारी येत गडभटकंतीला
सुरुवात करायची.उत्तरेकडे निघायचं .रस्यात छतविरहीत मंदिर लागत.चाैथ-यावर सप्तशृंगी देवीशी साधर्म्य असल्यासारखी मुर्ती ,इतरत्र अन्य शिल्प (खंडाेबा/म्हाळसासाईचे शिल्प असल्यासारखे)विखुरलेले दिसतात .
         उत्तर टाेकापर्यंत जातांना दगडी चाैथरा व तलाव लागताे .या किल्याच्या ईशान्य डाेंगरधारेवर भग्न दरवाज परीसरातील उध्वस्त तटबंदी अनं प्रवेशद्वार बघता त्या काळी हाच राजमार्ग असावा .हि डाेंगरधार बरीच पुढे पर्यंत गेलीय .त्यावर जागाेजागी टाके,बांधकामाचे अवशेष दिसतात . दुरवर शिडका(माेहंदरी) किल्ला व त्याही पलिकडले कळवण/बागलाण पुर्वचे अनेक गड-किल्ले /डाेंगरमाथे नजरेच्या टप्प्यात येतात..आल्या वाटेने परतीला निघायचं .पण बालेकिल्ला वजा टेकडीला उजवीकडे ठेवत.पुर्वला सप्तशृंगी गड फारचं माेहक दिसताे.
हा किल्ला विस्ताराने तसा एैसपैस मात्र अवशेष त्यामानाने फारचं अल्प .तरी ह्या विस्तीर्ण अहिवंतची भटकंती विलक्षण आनंददायी ठरते..
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
क़िल्ला अहिवंतकडे ...
रांग ::::: सातमाळा
उंची :::: ४०१२ फुट
मार्ग :::: १ -नाशिक >वणी >दरेगांव
           २- नाशिक > वणी > अचला/पिंपरी > बिलवाडी/अहिवंतवाडी
पायथ्याचं गांव ::पुर्व बाजुला दरेगांवा तर पश्चीम बाजुला बिलवाडी / अहिवंतवाडी
विस्तार :::: माेठा
अंतर नाशिकपासुन ::::
चढाई श्रेणी :::: साेपी
ट्रेकसाठी वेळ ::: एकुण ५ तास
गड़ावर पिण्यायाेग्य पाणी :: आहे
रहाण्याची साेय ::: पश्चिमे कडील गुहेत १५/२० व्यक्ती राहू शकतील ..
बेस्ट वेळ ::: सप्टेंबर ते मार्च

Monday, 24 February 2014

सर्वधर्म समभवाचे प्रतीक

                                                   सर्वधर्म समभवाचे प्रतीक  


           नाशिक शहरातील देवललीच्या सातही वॉर्डात सर्वधर्मीय व बहुभाषिक राहतात. त्या -त्या  धर्माचे उत्सव येथे एकीने साजरे होतात . शिंगवे बहुला अंबडवाडी गाव , लामरोड  व देवळाली शहरात बजरंगबाली यात्रा , नवग्रह शनिमंदिर उत्सव सोहळा , नवरात्रोत्सव आणि त्या निमित्ताने होणारे दरदिवसीय भजन , कीर्तन व प्रवचन सोहळ्याचे आयोजन महत्वाचे होय . लालदास स्वामींची यात्रा असो किवा खंडोबा महाराज यात्रा त्याचबरोबर लष्करी मुख्यालयाचा दुर्गा मोहत्सव ही  तन्मयतेने साजरा केला जातो . राज्यभर प्रसिद्ध असलेल्या भगुर येथील रेणुकादेवी यात्रेत  हजारोंच्या संखेने भाविक दर्शनासाठी येतात. 



देवळाली शहरात सिंधी ही संस्थाही धार्मिक कार्यक्रम साजरे करते. यात चेत्रीचंड , भगवान झुलेलाल यांचा मोहोत्सव , रंगपंचमी - होळी (ललालोई ) तसेच श्रावणात होणारा चाळीस दिवसीय उपवास ( चालिया ) हे सिंधी समुदायाचे मुख्य सन आहेत . मुस्लिम समाजाचेही धार्मिक सन , बकरी ईद व हि पारंपारिक उत्साहात साजरे होतात . देवळालीत मुस्लिम व बोहरी समाजाच्या मशिदी आहेत . शीख धर्मियांचे गुरुद्वार असून दरवर्षी गुरुनानक व गुरुगोविंदसिहजी यांच्या स्मृत्यर्थ विविध कार्यक्रम साजरे होतात .

  देवळालीच्या सर्वच धार्मिक कार्यक्रमात येथील बौद्ध धर्मियांचा सहभाग हा लक्षणीय आहे . बुद्ध पोर्णिमा व आंबेडकर जयंती निमित्त येथील ज्ञानमंदिरात विविध धार्मिक कार्यक्रम इथे होतात . शांतताप्रिय पारशी समाजाचेही येथे पारशी अग्यारी सारखे मंदिर असून दरवर्षी पतेतिसरखे सन हा समाज येथे साजरा करत आला आहे .

 लामरोड भागात अलीकडच्या काळात वाढत चाललेल्या जैन बांधवानी अत्यंत सुबक आणि देखणी मंदिरे उभी केली आहेत . यात प्रामुख्याने मुनिसुव्रत मंदिर , श्रीमद राजचंद्र स्वाध्याय मंदिर , कोठारी आरोग्यधाम येथील जैन मंदिर , बालगृह रोडवरील जैन मंदिर , लामरोड येथील सौराष्ट्रीय शिल्पातील कृष्णमंदीर तसेच कहाननगर येथील शिल्पकृती आणि या सर्वच ठिकाणी होणारे धार्मिक कार्यक्रम भाविकांना आकृष्ट करणारे आहेत . हिंदू - मुस्लिम , शीख , इसाई , सिंधी ,बौद्ध , मातंग , बोहरी, पारशी, गुर्जर, जैन, मारवाडी, आदिवासी, वडार अशा सर्व धर्मियांचे वसतीस्थान असलेले देवळाली हे खऱ्या  अर्थाने सर्वधर्मियांचे सर्वधर्म समभावाचे प्रतिक असून हे एक धार्मिक व ऐतिहासिक  पर्यटन स्थळ  आहे . 

Monday, 27 January 2014

सुविधांचा विकास गरजेचा

                   नाशिक शहराला ऐतिहासिक सांस्कृतिक पार्श्वभूमि लाभली आहे. सबंध देशातूनच नव्हे तर जगभरातून पर्यटक मोठ्या प्रमाणात शहराला भेट देत असतात. बदलत्या समीकरणानंतर शहराची ओळख हि बदलू लागली आहे. अध्यात्मिक पार्श्वभूमी बरोबर नव्याने औद्योगिक ओळख हि आता शहराने निर्माण केली आहे. नाशिकला भारताचे वाइन कॅपिटल म्हणूनही ओळखले जाऊ लागले आहे. एकूणच काय तर शहराची ओळख राष्ट्रीय नव्हे तर आंतरराष्ट्रीय शहर म्हणून दृढ होऊ  लागली आहे. देशभरातून येणाऱ्या पर्यटकांची उत्तम सोय करणे ही स्थानिक प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र पायाभूत सुविधांचा अभाव, प्रशासनाचे दुर्लक्ष, इत्यादींमुळे पर्यटकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. \


                 नाशिक शहरात असलेले पंचवटी या ठिकाणाला श्रद्धाळू मोठ्या भक्ती भावाने भेट देत असतात. मात्र या ठिकाणी निर्माल्या टाकू नये , वाहने धुवू नये अशा आशयाचे फलक जागोजागी लावलेले असतांनाही नाशिककर त्याकडे दुर्लक्ष करतांना दिसतात.त्यामुळे जागोजागी घाणीचे साम्राज्य, नदीपात्रातून वाहणारे प्रदूषित पाणी अगदी सहज नजरेत पडते. देशभरातून येणाऱ्या पर्यटकांना रामकुंडावर डुबकी मारावी कि नाही असे एकदा नक्कीच वाटत असेल .

                 गोदावरीच्या उगमापासून केवळ काही अंतरावरच असलेल्या आपल्या शहरात अशी वाईट अवस्था होत असेल तर नद्या मोकळा श्वास कधी आणि कुठे होणार असा प्रश्न पडतो. शहरात सार्वजनिक बस सुविधांचा कायमच होणारा खोळंबा, इच्छित स्थळी जायला लागणारा विलंब यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो.

                  शहराचे चित्र बदलायचे असेल तर पायाभूत सुविधांचा योग्य विकास करणे आज काळाची गरज बनली आहे. त्यासाठि  नाशिककरांनी देखील थोडे जबाबदार बनणे आवश्यक आहे. आपल्यामुळे आपल्या शहराची वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, इत्यादींचा खोळंबा होणार नही याची दक्षता घ्यायला हवी. -